सूर्य सोडून गेला आणि रात्रं एकटी पडली...
रात्रं असली तरी आपल्याच काळोखाला घाबरली,
रात्रीला घाबरलेला बघून पौर्णिमेचा चंद्र सोबतीला आला,
रात्रं म्हणाली, 'माझ्या काळोखाला घाबरून मला सोडून तर जाणार नाहीस ना?'
चंद्र म्हणाला, 'तुझा हा काळोखच तर प्रिय आहे मला... नाही जाणार तुला सोडून, दिले वचन मनापासून... '
रात्रं हसली, चंद्राच्या सोबतीत रमली, मुक्तपणे बागडली...
पण अमावास्येला चंद्र आलाच नाही..
रात्रं घाबरली, चंद्र हरवला म्हणून रडली,
चंद्राने फसवले तर नाही ना ? म्हणून चिडली
पण चंद्र आला,
रात्रं रागावली.. म्हणाली, 'वचन दिले होतेस, तरी का गेलास मला सोडून?'
चंद्र हसला.. म्हणाला, 'वेडे.. सोडून न्हवतो गेलो, तुझ्या काळोखाशी एकरूप झालो होतो,
तुझा झालो होतो... तुला दिसलो जरी नाही तरी तुझ्यातच सामावले होतो,
चंद्राचे तर रात्रीशीच नाते...
रात्रीच्या काळोखानेच तर चंद्राचे सौन्दर्य खुलते आणि
चंद्राच्या देखणेपणानेच तर रात्रं उठून दिसते...'
चंद्र हसला.... रात्रं लाजली.... चंद्र चंद्र झाली
आणि आकाशभर चांदणं बरसलं....