Tuesday, 17 September 2019

Diet (फसलेला) plan

"ताई, हा घ्या प्रसाद", असे म्हणून उकडीचा मोदक त्या युवतीने माझ्या हातात ठेवला. तोंडात टाकणार तेवढ्यात गुरुजींचा आवाज कानात घुमला...
"माप पडतय!!! माप पडतय!!!"
मी मोदकाला नमस्कार केला आणि त्याला डब्यात बंद केला...
आती रात्रीच्या पंचावन्न मिनिटात त्याला न्याय मिळणार होता..

एवढयातच गुरुजींच्या Diet विषयी आणि त्याच्या आलेल्या चांगल्या  परिणामांविषयी ऐकले होते, म्हणलं चला करून बघावे.. ह्या diet ला side effect काहीच नव्हते आणि झालो तर बारिकच होणार..(बारिक होण्याची कल्पनाच इतकी रमरणीय असते की माणूस कुणीही सांगेल तो पर्याय करुन बघतो त्यात गुरुजी तर स्वतः डॉक्टर आणि त्यांचे diet शास्त्रोक्त)

गुरूजींचे diet एकदम सोपे होते.. (म्हणजे निदान ऐकायला तरी) दिवसातून दोनदाच पंचावन्न मिनिटे हवे ते आणि हवे तेवढे खायचे बाकी दिवसभरात भूक लागली तर एक टोमॅटो, हवे तेवढे ताक आणि नारळ पाणी.
बस्स!! मग अगदी calendar बघून trip वरून परत आल्यानंतरच्या तिसऱ्या दिवसाचा मुहूर्त काढला (आणि संपूर्ण trip आता परत जाऊन diet सुरू करणार, खाण्या पिण्यावर पथ्य येणार म्हणुन ट्रिपभर वाट्टेल तसे खाल्ले)
मुहूर्ताच्या दिवशी सकाळी 'आता युद्ध सुरू होणार' अश्या प्रकारच्या भावना होत्या मनात.. सकाळच्या वेळेत ११:३० ते १२:२५ हे पंचावन्न मिनिटे ठरले तर रात्रीचे ७:३० ते ८:२५ हे. (आणि मधला संपूर्ण वेळ ह्या पंचावन्न मिनिटांची वाट बघण्यात जाणार होता हे लक्षातच नाही आले) पहिल्या दिवशी ऊठल्या-ऊठल्या नारळ पाणी प्यायले... छान सागर संगीत स्वयंपाक करून जेवणाचा (भरपूर) डब्बा भरला.. ऑफिस मध्ये जाहीर केलेलेच होते की आता मी लवकर जेवणार आहे त्यामुळे सगळेच सकाळपासून 'आजपासून काय गुरूजींचे diet का?' असे प्रश्न मला विचारत होते. पण माझा निर्धार पक्का होता. Office मध्ये पोहचल्या पासून सतत लक्ष घड्याळाकडे होते. जसे ११:३० झाले तशी डब्याची पिशवी उचलून थेट canteen गाठले.. लहानपणी शाळा सुटल्यावर जी भावना होत होती तीच जाणवली सगळे डबे पटापट उघडले आणि जठर अग्निला समिधा वाहिल्या.. शांत वाटले. परत काम चालू झाले आणि तीन तास काही जाणवले नाही मग थोड्या थोड्या वेळाने दोनदा ताक प्यायले, सतत घडल्याकडे लक्ष होतेच.. संध्याकाळच्या 55 मिनिटांची वेळ घरी जाऊन ७:३० वाजता ची होती.. 

पुढचे दहा दिवस  हा दिनक्रम उत्साहाने चालू होता. मग अचानक सासूबाईंच्या मैत्रिणी घरी आल्या. सासूबाईंनी विविध रूचकर पदार्थ बनविण्याचा बेत केला. अर्थातच मी मदत केली. पण माझ्या मनाच्या संयमाची अत्यंत परिक्षा घेतली गेली. कारण साधी चव बघण्यात पण माप पडते ना!  कसेबसे स्वतःला समजावले आणि चवीपासून लांब ठेवले. सासूबाईंची मैत्रिण पण गुरूजींचे diet करत होती. मला इतका आधार वाटला पण त्यांना दहा दिवसातच फरक जाणवला होता. कारण त्या रोज ४० मिनिटे चालायच्या. अरे देवा! गुरूजींच्या diet मध्ये हे पण होते होय! मी ते केलेच नाही. पण ठीके म्हणले आता करू. रोज सकाळी २० मिनिटे आणि संध्याकाळी २० मिनिटे चालायचे ठरवले आणि दोन दिवससुद्धा ते जमवता आले नाही. त्यातून पुढच्या आठवड्यात   येणारे मित्रमंडळींचे कार्यक्रम आणि office मध्ये जिवलगांचे वाढदिवस माझ्या diet संकल्पनेची माती करणारे ठरले. मी बारशाची बर्फी, मुंजीचा पेढा, लग्नाचा लाडू, वाढदिवसाचा केक मनसोक्त खाल्ला. कसेबसे सगळे पंचावन्न मिनिटात बसवत होते..

आता गुरूजींचा diet चालू करून साधारण महिना झाला असेल म्हणलं चला वजन करूयात. तर वजन काटा जिथल्या तिथेच. १ gm सुद्धा अलिकडे येण्याचे त्याने कष्ट घेतले नाहीत. पण माझ्यातला सकारात्मक वृत्तीने मला हरू दिले नाही. म्हणलं चला निदान वजन वाढले तरी नाही. अजून थोडा प्रयत्न केला तर होईल कमी.
मग मला अचानक कळले की जे लोकं diet करतात त्यांचा म्हणे एक cheating day असतो. त्या  दिवशी ते diet पाळत नाहीत. मला ऊगाचच दिलासा वाटला.
पुढचे काही दिवस घड्याळा कडेच जास्त लक्ष असायचे. मला अचानकच वेळेचे त्यातुनही मिनिटा मिनिटाचे महत्त्व वाटू लागले. आधी ठरविले की महिन्यातून एक दिवस cheating करायची. अचानक मैत्रिणीं बरोबर बाहेर गेले आणि तोच दिवस cheating ठरला. पण मग जाऊ दे अजाणतेपणी झाले असे म्हणुन आता महिनाभर  प्रामाणिक पणे diet करूयात असे ठरवले. आणि दुसऱ्याच आठवड्यात प्रचंड पाऊस पडून सगळीकडून वडापावच्या वासाने मला घेरले. मागून गुरूजींचा माप पडतंय असा पुसटसा आवाज आल्या सारखा वाटला खरा पण मग माझ्या मनाचा cheating day हा आवाज जास्त जवळचा वाटला. असे प्रत्येकच पदार्थांचे वास मला खेचू लागले आणि cheating day आता दर दोन दिवसांनी येऊ लागला. आता आपण खूप जाड होऊ अशी परत मनाला भिती वाटू लागली पण त्या भिती पेक्षा हे येणारे वास आणि  प्रचंड आवडीचा पदार्थ आपल्या समोर आपल्याला न मिळता लोकं खातायेत ह्याचं दु:ख जास्त होतं. आता निर्णय घ्यायचा होता.. मी गाडी पाणीपुरीच्या गाडी समोर थांबवली. (पाणीपुरी खाता खाता मी कायमच आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेतलेत) साधारण दिड महिन्याने पाणीपुरी खाणार होते.. काय आत्मिक आनंद मिळत होता.
त्या प्रत्येक पुरीने "माप" कदाचित पाडलं असेल पण कुठलाही diet आपल्यासाठी नाही हे पण समजावले..
पहिली प्लेट संपताच मी "और एक" म्हणाले, माझा निर्णय झाला होता...