Saturday, 16 May 2020

गोष्टीची गोष्ट

लहान मुलांकडून काहीही करून घेणे म्हणजे त्यांच्याकडून करून घेणाऱ्याच्या संयमाची परीक्षाच. मग ते आई वडील असोत, शिक्षक असोत, coach असोत वा अजून कुणी.. श्रेयसस्वा इव्हेंट्स अँड मोर यांनी आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेसाठी तयारी करून घेताना घडलेल्या गंमती जमतींची ही "गोष्टीची गोष्ट"..

मला दोन मुले, मोठा 7 वर्षाचा आणि धाकटा 4.30 वर्षाचा..
मोठ्याला पाठांतराची खूप आवड आणि धाकटा तसा फारच लहान पण कविता श्लोक हे खेळता खेळता का होईना पाठ करी.. 
त्याच्याकडून गोष्ट कशी बरं पाठ करून घ्यावी ह्याचा विचार मला करावा लागला!!
मग सगळ्यात सोपं होतं त्याच्या आवडीची गोष्ट निवडणं.. दोन दिवस वेग वेगळ्या गोष्टी सुचवल्यानंतर.. अंतिमतः "बुड बुड घागरीची" गोष्ट ठरली.. आता पाठ करून घेण्याचे दिव्य होते.. पण माधवला, तू नको सांगू मी म्हणतो म्हणत मनानेच सांगायचे होते.. आधी तीन चार दिवस तर गोष्टीत तीन प्राणी आहेत, मांजर, माकड आणि उंदीर हेच पाठ करून घायवे लागले.. कारण अचानक त्याच्या गोष्टीत कुत्रा शिरत होता..  नंतर लक्षात आले की आमचे माधवराव त्यांची त्यांची गोष्ट खूप छान संगतायेत.. मग मी असे ठरवले की ती गोष्ट पाठ करून नाहीच घायची त्याला फक्त रोज निदान 5 ते 8 वेळा गोष्ट वाचून दाखवत राहायची आणि दिवसातून दोनदा त्याच्याकडून म्हणून घ्यायची आणि चेहऱ्यावरचे हाव भाव अन् हातवारे करून, माधव मनाने गोष्ट सांगू लागला..

मयंक च्या बाबतीत मला वाटलं होतं त्या पेक्षा जरा अवघड गेली मोहीम.. साध्या साध्या गोष्टी सांगायची सवय आहे त्याला पण त्या एकदम छोट्या छोट्या.. गुरू शिष्यांची गोष्ट त्याच्या वयोगटला दिलेला विषय.. नुकतेच आम्ही सुधा मूर्थी ह्यांच्या "आजीच्या पोतडीतल्या गोष्टी" ह्या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले होते. त्यातली एक गोष्ट जी गुरू शिष्यांची होती ती त्याला खूप आवडली होती. गोष्टीमध्ये प्रमुख तीन प्रसंग होते. त्यांचा क्रम त्याला लक्षात ठेवायचा होता. थोडे थोडे वाचता येत असल्याने, तोच अधून मधून पुस्तक घेऊन गोष्ट जशी जमेल तशी वाचे, आणि घरातल्या सगळ्यांना ती गोष्ट सांगे. अशी हळू हळू तो त्याची practice करत होता. मला वाटलं याचे recording तर पटकन होऊन जाईन..
मग अधून मधून दोघांच्या recording काही विफल प्रयत्न मी केले होते. पण माझे आधी कर, मग एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना पाठ असल्याने मधे मधे बोलणे, पुढची गोष्ट सांगणे, मधूनच हसणे, तोंडं वाकडी करणे.... आणि अचानकच मारामाऱ्या चालू करणे अश्या सगळ्या छोट्या छोट्या युद्ध प्रसंगांंवर मात करून, अखेर ह्या दोघा वीरांना मी त्यांच्या त्यांच्या गोष्टींचे शस्त्र घेऊन दुसऱ्याच्या गोष्टीच्या मधे मधे न करता, आपले आपले युध्द लढण्यासाठी तयार केले. (वाचणाऱ्याला असे वाटू शकते की खोलीचे दार लावून का नाही केले record,  एकाचे recording चालू असेल तर दुसरा दार जोर जोरात वाजवून मोठमोठ्याने मला सोडून का करताय असे इतक्या मोठमोठ्याने ओरडणार की गोष्टी ऐवजी त्याचा आवाजच रेकॉर्ड होणार म्हणून)
आमचे माधवराव recording त्यांच्या mood नुसार करणार म्हणून मी आधी त्याचा video करून घ्यावे म्हणलं. किती वेळ लागणार होता माहीत नाही. याचा मधूनच mood गेला तर परत पहिल्या पासून करून घेणं.. केवढा बिकट प्रसंग. पण माधवला काही नियम सांगून video करायला सुरुवात केली. उभे राहून म्हणायला सांगितले होते पण रेकॉर्ड करताना अचानक तो बसला. मला वाटलं घोडा अडला आता. पण नशीब माझे की आता मी बसूनच करतो एवढंच म्हणाला आणि स्वतःहूनच सगळी गोष्ट पहिल्यापासून म्हणून टाकली. चक्क सलग.. मधे मधे काहीही न बोलता. मला आश्चर्याचा सुखद धक्का. लगेच मुग्धाला video पाठवून दिला.. उगाच माझीच दृष्ट लागून video delete बिलीट झाला तर ह्या भीतीने!!
आता मयंक चे recording करायचे होते. मला वाटलं होतं ह्याने practice एकदम कडक केलीये ह्याचं तर recording पटकन होऊन जाईल. म्हणून मी बिनधास्त त्याला सुरू कर म्हणाले आणि मयंक एवढ्या वेळा अडखळला. की मला ते recording बंद करावे लागले. त्याला मी काय झाले विचारले तर तो म्हणाला शब्द जसेच्या तसे आठवत नाहीयेत. मग मला लक्षात आले की हा गोष्ट सुद्धा कवितेसारखी जशीच्या तशी म्हणायचा प्रयत्न करतोय. मग त्याचे जरा बौद्धिक घ्यावे लागले. की कविता जशी च्या तशी म्हणायची असते.. पण गोष्ट समजून मनाने सांगायची असते. त्याला ते पटले पण जमे पर्यंत आम्ही निदान 20 video केले. अखेर त्याने सलग गोष्ट सांगितली. ती पण लगेच स्वप्नालीला पाठवली..
हुश्श झालं. पण ह्या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांच्या सादरीकरणाची क्षमता लक्षात आली आणि नेमके कुठे काम करायचे आहे हे पण लक्षात आले. कोणत्याही स्पर्धेचा बक्षिस हा गौण भाग असतो. ती तयारी करताना आपण स्वतःला कसे कसे तयार करतो आणि किती स्वतःवर किती विश्वास ठेवतो हे महत्वाचे. श्रेयस्वा इव्हेंट्स अँड मोर च्या स्पर्धेच्या निमित्ताने, पालक म्हणून माझ्या संयमाची आणि मुलांच्या पाठांतराची कसोटी पहिली. आणि गोष्ट पाठ होई पर्यंत घरात गोष्टमयआणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते. उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. आणि मुग्धा आणि स्वप्नाली दोघीही अत्यंत प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. मला नक्कीच त्यांना धन्यवाद म्हणायचे आहे. की त्यांनी मुलांचा सादरीकरण ह्या कलेकडे बऱ्याच पालकांचे लक्ष वेधले.. ☺️

Sunday, 10 May 2020

अबला न माझी ही माता

असं म्हणतात, आईची मांडी ही लेकराचे पाहिले विद्यापीठ असते. खरं तर घरातल्या प्रत्येकाच्याच वर्तणुकीचे अनुकरण घरातील लहान मुले करत असतात पण आईशी तर नाळेने जोडले गेलेले नाते असते.. शब्दांच्या पलीकडचे आणि समजुतीच्या धाग्याचे..
लहानपणी आजीने हिरकणी ची गोष्ट सांगितली होती.. एक आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते हे त्या गोष्टीचे तात्पर्य.. प्रत्येकच आई कदाचित हिरकणी असते.. आज मी देखील आई आहे पण माझ्या आई मधली ती माझ्यासाठीची हिरकणी, आज मला माझ्या मुलांसाठी देखील दिसते..
आम्ही दोघे भावंडे.. भावाला खेळाचे छंद.. म्हणून त्याला बॅडमिंटन शिकण्यासाठी ती घेऊन जाई.. उन्ह पाऊस, कशाचीही परवा न करता ती त्याला coaching साठी नियमित घेऊन जाई.. तो जसा मोठा झाला तसा तो एकटा जाऊ लागला.. पण त्याला योग्य आहार मिळावा म्हणून ती त्याला संपूर्ण दिवसभराचे त्याच्या आवडीच्या पदार्थांचे चार वेगवेगळे डबे द्यायची आणि बऱ्याचदा स्वतः पोहचवायची.
आमच्या शाळा कॉलेज मध्ये कधी कोणत्या स्पर्धांसाठी practice करायला उशीरा पर्यंत मला थांबावे लागले तर मला थांबता यावे म्हणून ती नेहमी मला सोबत करायची. तिची मुलगी असले तरी कोणत्याही मुलापेक्षा मला कमी स्वतंत्र्य न्हवते..
आमच्या आवडीचे खाद्यपदार्थ करणे.. वेगवेगळ्या सणांना, कार्यक्रमांना आमची पूर्ण हौस मौज करणे.. आमच्या अभ्यासात तिचे कायम व्यवस्थित लक्ष असणार.. अभ्यास आणि वाचन ह्यांचे महत्व आमच्या आयुष्यात तिने कायम टिकवून ठेवले.. बऱ्याचदा पालक तक्रार करतात की मुलं ऐकत नाहीत.. आम्हीही कदाचित असू तसे पण तरीही शिक्षणाचे महत्व तिने कायम समजावून सांगितले.. आमचे शाळेचे projects असो, कोणते शिबीर असो किंवा कोणता camp असो.. आम्हाला नेहमीच प्रोत्साहन मिळायचे..
जसजशी मोठी व्हायला लागले तसतशी स्त्रियांविषयीच्या आपल्या समाजात असलेल्या प्रचलित झालेल्या अन्यायांंविषयी समजू लागले तेव्हा दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या, पहिली, माझ्या आईने माझ्या मध्ये एवढे धाडस का भरले ते आणि दुसरी म्हणजे ज्या पद्धतीने माझ्या आईने मला वाढवले त्या पद्धतीने  वाढवताना तिला कशा कशाला सामोरं जावे लागले असेल ह्याची कल्पना आली!!! 
संगोपनाचा हा वारसा तिला कदाचित तिच्या आई वडिलांकडून मिळाला होता, आणि तो ती हिरकणी सारखाच आजही पेलत आहे. आता माझी आई आजी झाली पण तिच्या आजी होण्यातही तिचं मातृत्व आहेच.. माझ्या नोकरी मुळे माझ्या मुलांच्या कालागुणावर खेळण्यावर परिणाम होऊ नये म्हणून पूर्वी ती जे माझ्या भावासाठी करायची आज ती ते माझ्या मुलांसाठी करतीये. ती तेव्हाही superwoman च होती आणि आजही आहेच.. 
आईने मला नुसते ह्या जगात आणले नाही तर ह्या जगाला सामोरे जाण्यासाठी तयार केले.. ह्या जगण्यात अनेकदा मी चुकते, पण आजही ती माझ्या चुकांना माझा कान धरतेच.. 
कोणत्याही बिकट प्रसंगाला धीराने सामोरे जाणे.. कोणत्याही कार्यक्रमात स्वतःची सर्जनता वापरून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवणे.. घरी आलेल्या कितीही पाहुण्यांचा हसतमुखाने पाहुणचार करणे.. निस्वार्थ भावनेने दान करणे.. कुणालाही कधीही कोणत्याही प्रकारची मदत करायला मागे न सरकणे.. जसे जमेल तसे सगळ्यांचे लाड करत राहणे.. आणि एवढं सगळं करूनही कायम पडद्यामागे असणे.. हे आईला सहज जमतं.. 
स्त्री शिवाय समाज, कुटुंब आणि जीवनही (स्त्री पुरुष दोघांचे) अशक्य आहे. आणि तरीही समाजाचा शोषित घटक ही स्त्रीच आहे.. 
स्त्री ही सबलाच असते.. तिला समजून घेण्यात आणि तिचा मान ठेवण्यात समाज कमी पडू शकतो पण म्हणून ती अबला नाही होत.. असं म्हणतात की स्त्री ही भगवंताची उत्कृष्ट कलाकृती आहे.. पण आई हा भगवंताने निर्माण केलेला अद्भुत अविष्कार आहे..
माझ्या आईला मी कायम स्वाभिमानी आणि तत्वनिष्ठ जीवन जगताना पाहिलंय.. त्यामुळे मी अभिमानाने म्हणून शकते अबला न माझी ही माता..  माझ्या देवाला माझी हीच प्रार्थना की मला माझ्या आईसारखी आई होण्याची शक्ती आणि बुद्धी दे!!!