अरुंद रस्त्यामुळे इथली वाहतूकही समजूतीवर चालते.. ज्याला सरकायला जागा मिळाली त्याने गाडी बाजूला करायची आणि समोरच्याला जागा द्यायची.
डोंगर लांबून पाहिला तर संपूर्ण डोंगरावर घरच घरं दिसतात.. वेग वेग वेगळ्या आकारांचे विविध रंगांचे.. त्या डोंगराला त्या घरांनी सजवलंय असं वाटतं.. खोल दरी पर्यंत ती घरं पसरलेली दिसतात.. चढ - उतार इथे राहणार्यांच्या जगण्याचाच एक अविभाज्य घटक..
शेजारच्या झाडाशी उंच होण्याची स्पर्धा असलेले उंच उंच झाडं आणि ह्या झाडांमधून, मधून- मधून खेळणारे ढग आणि कधी कधी ह्या ढगांच्या आरपार होणारा सूर्यप्रकाश.. डोंगरातल्या गावात हा खेळ अमाप दिसतो.
दरीकडे तुम्ही बघत बसलात तर हिरव्या रंगाच्या एवढ्या विविध आणि सुंदर छटा दिसतात की कोणत्याही प्रकारे कोणत्याही रंगपेटीत त्या सामावून घेता येणार नाहीत..
डोंगरातल्या गावात शुभ्र पांढरे ढग तुम्हाला सगळीकडे साथ देतात. कधी कधी तर एवढी गर्दी करतात की समोरचेही दिसत नाही आणि कधी कधी 'आजूबाजूचा प्रदेश पटकन डोळ्यात साठवून घ्या' असे सुचवत कुठेतरी गडप होतात आणि तितक्याच घाईने परत येतात..
डोंगरातल्या गावात माणसांची वस्ती कमी दिसते.. पण दरीतून सतत येणारा तो शांततेचा आवाज आणि कितीही सूक्ष्म असले तरी त्या दरीत राहणार्या जीवांची ती रमणीय आणि सततची कुजबुज मनाला शांत करते. वाहत्या पाण्यासारखा झाडांच्या पानांचा होणारा आवाज, एखाद्या अंगाई सारखा तुम्हाला गुंगवून टाकतो..
अधूनमधूनच एखादे वाहन ऐकू येते पण सततची पसरलेली शांतता अनुभवायला येते..
माणसाने निसर्गावर केलेले अतिक्रमण ह्या डोंगरातल्या गावातही दिसतेच पण इथला निसर्ग ह्या माणसांना सतत त्याचे वर्चस्व जाणवून देत राहतो! सांगत राहतो की तुम्ही यात्रेकरू आहात.. येत जात राहणार.. पण मी मात्र इथेच राहणार!