आज सकाळी 'ऑपरेशन सिंदूर'च्या बातमीने जाग आली आणि आणि दिवसाची
सुरुवात उत्तम झाली. भारत नेहमीच एक शांतताप्रिय देश राहिला आहे. पण गेल्या १०
वर्षांत भारताने हे देखील दाखवून दिले आहे की वैदिक धर्माने शांततापूर्ण जीवनाचा
उपदेश केला असला तरी, जेव्हा
आपल्या संस्कृती आणि स्वाभिमानावर हल्ला होतो तेव्हा आपली शक्ती दाखवायलाही शिकवले
आहे. या कृत्त्याला काहीजण 'बदला'
म्हणत असले तरी, ही कृती फक्त
‘बदला’पेक्षा खूप मोठी आहे. ही कृती जगाला हे दाखवण्याची आहे
की जे ‘आमचे आहे त्याला स्पर्श करताना सावधगिरी बाळगा. आम्ही तुमच्या
सीमांचा आदर करतो आणि जर तुम्ही तो आदर राखत नसाल, तर आदर कसा करायला लावायचा ते पण आम्ही शिकवू!’
लोकशाही आपल्याला अधिकार देते, पण त्यासोबतच जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये
देखील येतात. भारतीय संस्कृतीने नेहमीच 'कर्तव्य प्रथम' यावर
जोर दिला आहे. आजकाल, हक्कांची
चर्चा अधिक होते, पण
कर्तव्यांकडे दुर्लक्ष केले जाते. भौतिक सुखांच्या मागे धावताना, आपण माणूस म्हणून आपली मूळ ओळख विसरून
चाललो आहोत.
परंतु,
जेव्हा युद्धासारखी परिस्थिती येते,
तेव्हा प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य अधिक
महत्त्वाचे होते. त्यावेळी, प्रत्येक
नागरिक हा एक सैनिक असतो. देशाच्या संरक्षणासाठी आणि एकतेसाठी प्रत्येकाने
आपापल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे. कालान्तराने, शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.
मुलामुलींना समान लष्करी प्रशिक्षण द्यायला हवे आणि काही काळ सैन्यात सेवा करणे
अनिवार्य करायला हवे.
या
युद्धाच्या काळात, प्रत्येक
भारतीयाने जागरूक, सहाय्यक
आणि सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. एकत्रितपणे आपली कर्तव्ये पार पाडण्यातच
आपल्या देशाची खरी शक्ती आहे. हे लक्षात ठेवूया की जेव्हा आपण आपली जबाबदारी
योग्यरित्या पार पाडतो, तेव्हाच
आपले हक्क सुरक्षित राहतात. विशेषतः जेव्हा आपल्या राष्ट्रावर संकट येते, तेव्हा एकजुटीने आणि धैर्याने एक राष्ट्र बनून उभे राहणे
हे आपले परम कर्तव्य आहे.