Friday, 6 October 2017

पन्हाळगड_ते_पावनखिंड


बसचा ब्रेक दाबल्यामुळे जाग आली आणि डोळ्यांसमोर धूसर धूसर चित्र होते. डोळे चोळले पण ते चित्र डोळ्यासमोरून जाईना. डोळ्यांना काही झाले का? असे वाटण्याआधीच लक्षात आले की जेवढे झोपेत आपण आहोत तेवढेच धुके बाहेर आहे. घडयाळ पाहिले तर पहाटेचे पाच वाजले होते आणि खिड़की बाहेर पाहिले तर पन्हाळगडाची पाटी होती. 

पुण्यावरुन जसे प्रस्थान झाले तसे थोड्याच वेळात पुष्कराजने साक्षात बाबासाहेब पुरंदरेंचे, बाजीप्रभु देशपांडेंवरील कथाकथन ऐकवले. पावनखिंडीचे दर्शन घेण्याची ईच्छा तर मनात होतीच पण ते कथन ऐकल्यापासुन ती जास्त दृढ़ झाली. बाबासाहेबांचे कथन संप्पेपर्यंत मनाला आफळे बुवांचे किर्तन ऐकण्याचे डोहाळे लागले आणि ते लगेचच  पुर्ण झाले. डोळयात पाणी आणि अंगावर शहारा, असा परिणाम करणारे ते किर्तन परत-परत ऐकावे असे वाटत होते. या दोहोंनी कान तर तृप्त झालेच पण जसा डोळा लागत होता तसे डोळ्यांसमोर बाजीप्रभुंचे रूप अजुनच गडद होत होते, असं वाटत होत..  ते सगळं  युद्ध मी माझ्या डोळ्यांनी बघतच आहे. रक्ताच्या थारोळयात उभी ती बाजीप्रभुंची आकृती काही केल्या डोळ्यांसमोरून जातच नव्हती. तेवढयात गाड़ी थांबली आणि डोळे उघडले तर त्या धूसर दृशाने मनाला अजुनच हळवं केलं. बाजीप्रभुंची ती काया कोसळल्यावर कदाचित असच धूसर झालं असेल सगळं.. असं वाटंल.. आणि ऊर भरुन आला.. 

पन्हाळगडावर असलेल्या बाजीप्रभुंच्या प्रतिमेला प्रणाम करून 'वारीला' आरंभ झाला. तीर्थक्षेत्री चालत पोहचणे आणि भगवंताचे दर्शन घेणे म्हणजे वारी. आणि जिथे आम्ही जाणार होतो ते क्षेत्रं तर साक्षात आपल्या आयुष्याची समिधा वाहून स्वराज्याचा यज्ञ ज्वलन्त ठेवला,  अशा महापुरूषाच्या पराक्रमाची स्मृती जागवणार होतं. रात्री ऐकलेले आजुन कानात घुमतच होत. त्या स्मृतींना मनात स्मरत बाजीप्रभूंच्या त्या प्रतिमेला वंदन करून आम्ही पुढे निघालो. आता अल्प कालावधीसाठीचं ध्येय मिळालं होतं, लागोपाठ दोन दिवस चालत राहायचं. शरीराच्या आणि मनाच्या क्षमतेची परीक्षा घेत. शरीर थकणार पण मनाने हरायचं नाही, आणि मन हरले तरी शरीराने चालत रहायचे.

आधी संपूर्ण ग्रुपसोबत चालण्याचा प्रयत्न केला, पण लक्षात आलं की क्षमतेमध्ये प्रचंड तफावत आहे, आणि त्या सगळ्यांबरोबर चालणं काही आपल्या क्षमतेत नाही. मग असं ठरवलं कि, निदान न थांबता चालत राहूया. भर-भर नहीं चालता आलं तरी चालेल पण थांबुन नको रहायला. मसई पठारापर्यंत सगळ्यांबरोबर चालु शकले आणि मग त्या नंतर 'में और मेरी तनहाई' असेच चालत राहिलो. मसई पठारावर पोहचल्यावर मात्र विलक्षण वाटत होतं.. अधून मधून पडणारा पाऊस आणि प्रचंड वारं, इतकं की पाऊल पुढे टाकताच येत नव्हतं.. वारा आपल्याला उडवून तर नेणार नाही ना! असं वाटत होतं.. प्रवाहा विरुद्ध तरंगणारी नाव जशी डगमगेल तशी पावलं टाकीत यात्रा सुरू होती.. वाऱ्याच्या प्रचंड प्रवाहामुळे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध उडणारा धबधबा बघितला आणि त्या वाऱ्याच्या क्षमतेची अजूनच तीव्रतेने जाणिव झाली. अश्या या प्रचंड वाऱ्याबरोबर युद्ध करत चालताना पाय पुर्ण थकून गेले होते. अजून अर्धी वाट पण सरली नव्हती. अरे बापरे..! इतक्यात थकलो? आफळेंचे शब्द कानात घुमू लागले. "तोफे आधी न मरे बाजी, सांगा मृत्युला" आणि मनाने ठरवले की देहाला थकू दयायचे नाही. बाजींनी देहाचा संप न जुमानता संपुर्ण बारा तास युद्ध केले. मला तर फक्त न थांबता चालायचे होते. कासवाची आणि सस्याची गोष्ट आठवत होती. जिंकण्याची अपेक्षा आणि ईछा दोन्ही नव्हती फक्त अर्धवट सुटू नये असे वाटत होते, आणि जे आपण ठरवतो ते पुर्ण करतो हा स्वता: बद्दलचा विश्वास दृढ करायचा होता. 


गिर्यारोहणाची आवड तशी खुप जुनी पण मातृत्त्वाच्या वारदाना नंतर आणि जवळ-जवळ सहा वर्षानंतर पुन्हा डोंगर चढ़त होते. स्वतःच्या क्षमतेवर खरंतर  शंकाच होती, आणि पुर्ण करू की नाही असं वाटत होतं.  पण बाजीप्रभूंचा पुरुषार्थ, आणि माझ्या वयाच्या दुप्पट वयाचे माझे तीर्थरूप बाबा, माझ्या बरोबर मला प्रेरणा दयायला चालत होते. आत्मबलावर आपण कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करू शकतो ह्याचं  जीवंत उदाहरण सतत माझ्या बरोबर चालत होतं. 


जेवणाच्या वेळेपर्यंत मी संपूर्ण संपले होते. पुढे एकही पाऊल टाकण्याची देहाची तयारीच नव्हती. पण मन काही ऐकायला तयार नव्हते. सतत देहाला सांगत होते. मी नेहमी  तुझे चोचले पुरवतो, आता तू माझी इच्छा पूर्ण कर.. अडून बसलेल्या बैलाला मारून मुटकुन शेतात नांगर फिरवायला लावले की त्याला जसे वाटत असेन तसेच माझ्या देहाला वाटत होते. फरक फक्त एवढाच की मालकही मीच आणि बैलही मीच, माझा संघर्ष माझ्याशीच.. जड़ झालेली पावलं उचलत फक्त सतत चालत रहायचे असे ठरविले होते, तेच करत राहिले. शरीराचा प्रत्येक अवयव आणि प्रत्येक घटक मला दुखून-दुखून सांगत होता, "नको...!" "आता बस...!" "नाही होणार" पण मन परत चाबकाचे फटके मारल्यासारखं रागवत, समजावत, ओढत होते.


अधुन मधून पडणाऱ्या पावसामुळे वाटेत प्रचंड चिखल आणि अनेक ठिकाणावरून वाहणारे झरे होते. हिरवळ पांघरलेले डोंगर दूर पसरले होते. अंतर संपतच नव्हते आणि संपलेल्या देहाला मन समजावत ओढत आणत होते. थोड़े पावसाने आणि बरेचसे घामाने ओले झाल्याने थकवा अजुनच वाढत होता. दिवस मावळे पर्यंत कसे बसे गावात पोहचले, आणि पाठीवरची बँग टाकून जेव्हा जमिनीला टेकले तेव्हा असं वाटलं, 'बास आता चालवू नका आणि उठवू पण नका'. जेवण आणायला जाण्याची ताकद पण नव्हती माझ्यात. तेव्हा मदतीला आल्या त्या PHE च्या कार्यकर्त्या ग्रुप बरोबर जाण्याचे महत्त्व तेव्हा कळले. एकमेकांना एकमेकांची सहायता मिळणे. पहिल्या घासाला लक्षात आले की प्रचंड भूक लागलेली आहे. तोपर्यंत देह इतका थकला होता की भुकेची जाणिवसुद्धा झाली नव्हती. पहिल्या घासाने मात्र ती तीव्रतेने करुन दिली. जेवण संपवले आणि जी ब्रम्ह्ननंदी टाळी लागली ती थेट पहाटे कधीतरी जाग आली. पण जड़ शरिराला उठवतच नव्हतं. कसेबसे उठून आवारा आवरी केली आणि परत दुसऱ्या दिवशीचे चालणे चालु झाले. आता मात्र मनाचा आणि शरीराचा संघर्ष संपला होता. आता शरीर हे यंत्र झाले होते. आणि चालत राहणे एवढेच त्याचे कर्तव्य होते. पण त्याही पेक्षा आता त्या जागेचे दर्शन होणार होते जिथे इतिहासातील सुवर्णक्षरात लिहिलेली शौर्यगाथा घडली, त्याची उत्सुकता मनाला लागली होती.

आजही निसर्ग आपल्या वैविध्यपूर्ण सौंदर्याचे दर्शन देतच होता. पावसाचा लपंडाव, छोट्या-छोट्या झऱ्यांची अधून मधून हजेरी प्रचंड चिखालाचा गालिचा, धुक्याची टोपी घातलेले डोंगर, प्रसन्न शेते आणि घनदाट झाडे. या निसर्गाच्या विविध रुपांचा अनुभव घेत, यांत्रिक झालेली पावले टाकीत मी अंतर कापत होते. जत्रा असल्यासारखी गर्दी होती. ज्यांच्या बरोबर आले होते ते जरा मागे पुढे झाले होते. नाही नाही पुढेच गेले होते. पण नवनविन सवंगडी भेटत होते. नविन माहिती मिळत होती. काहीजण अगदीच टुकारपणा करायला आले होते पण काही लोकांबरोबर संवाद साधुन आनंद वाटला.



निसर्गाच्या या विविध छटांमध्ये  बसलेली अनेक गावं वाटेत लागली. प्रामुख्याने शेतीवर जगणारीच कुटुंब असावीत. जगण्यासाठी पुरत असेन एवढी शेती ते नक्कीच करत असतीन पण एका गोष्टीचे मात्र दुःख वाटले. गावातील लहान लहान मुले थोड्या थोड्या अंतरावर उभे राहून गोळया मागत होती आणि त्यांच्या घरच्यांना ह्या गोष्टीचे कौतिक वाटत होते लहानपणापासूनच त्यांनी अस "मागावं" याचं दुःख वाटलं. स्वतःहून कुणी दिलं तर गोष्ट वेगळी. पण भिक मागणं??? वाईट या गोष्टीचे वाटले की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न साकारलं ते का त्यांच्या ह्या पुढच्या पिढ्यांनी बलिदानाचं रक्त सांडलेल्या मातीत असं भिक मागावं म्हणून? त्या पुढचे दुःख म्हणजे मागतोय म्हणून जे देतात त्यांच्या बद्दल वाटले कुणीही त्या मुलांना लाचार करण्यासाठी देत नव्हतेच पण त्या मुलांना अश्याने आपण मागण्याची सवय लावतोय हे त्यांच्या लक्षातच येत नव्हते. दया असणे आणि वाटणे हे संवेदंशील मनाचे लक्षण असले तरी मनाने प्रगमशील असले पाहिजे आणि त्यासाठी जे आवडतंय ते करण्यापेक्षा जे योग्य आहे ते करण्याची शिस्त मनाला लावली पाहिजे.


हा विचार करत असतानाच डांबरी रस्ता लागला आणि लक्षात आलं की आता आपल्याला बसमध्ये बसावे लागणार आहे. कारण आपण सगळ्यात मागे पडलेले आहोत. म्हणजे निदान या वर्षी तरी आपण पायी यात्रा पूर्ण करू शकत नाही असे स्पष्टच झाले. मग बसमध्ये बसूवून  पावनखिंडीकड़े नेण्यात आले. तिथे पोहचलो तेव्हा बाजीप्रभुंच्या शौर्यगाथेचे कुणी मावळा कथन करत होता. ऐकलेलेच परत ऐकत होते पण तरीही परत शहारे अनुभवत होते. आता प्रत्यक्ष त्याजागी होते, जिथे हे सगळं घडलं होतं. "जय भवानी.. जय शिवाजी" च्या घोषात पावनखिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायला पुढे निघालो. पुन्हा कनात आफळेंचे शब्द घुमू लागले "तोफे आधी न मरे बाजी, सांगा मृत्युला." अंगावर शहर आला.. पावसामुळे पावनखिंडीत जाता येणार नव्हते पण तिथे उभ्या असलेल्या स्मारकाचे दर्शन घेताना मन पुन्हा भरुन आले. एकिकडे दोन्ही हातात तलवारी घेऊन लढा देणारे बाजी दिसले तर दुसरीकडे गोळ्या मागणारी ती मुलं... पुन्हा एकदा बाजीप्रभुंना.. त्यांच्या पराक्रमाला.. ह्या पराक्रमात साथ देणाऱ्यांना नमस्कार केला आणि त्या स्मारकापुढे नतमस्तक झाले. 
आणि पुढच्या वेळी जेव्हा येईन तेव्हा संपुर्ण चालेन असे वचन स्वत:लाच दिले. 

आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपल्याला काही शिकवायलाच घडत असतात. मोहिम मी करणं मला फार महत्वाचं होत. एकतर ज्यात आपल्या मनाला आनंद मिळतो असे काहीतरी अनेक वर्षांनी करत होते. मला सगळ्यात आधी पोहचायच नव्हंतच मला फक्त पोहचायचं होतं. पुन्हा एकदा मनाच्या क्षमतेचा पुरावा मिळाला. कधीच थकलेल्या शरीराला जवळ जवळ दीड दिवस मनाने ओढत आणले होते. मी पोहचले पण त्याचं पुर्ण समाधान नाही मिळालं. पण परत कधीतरी जावं लागणार हे तर ठरलंच. 


एखाद्या ग्रुपबरोबर महाराष्ट्रात गिरियारोहणाचा हा पहिलाच अनुभव माझा. साधारण ऐकीव माहिती नुसार ग्रुप बरोबर ट्रेक करणारी लोकं थिल्लरपाणाच  जास्त करतात असा माझा समाज होता. पण प्रवासाची सुरुवातच बाबासाहेब आणि आफळेंबुवांनी केल्याने PHE ने हा माझा समाज पहिल्या तासातच खोटा पाडला. पन्हाळगडावर केलेली छान सोय, पोटभर दिलेला खाऊ शिवाय काळजी घेणारे कार्यकर्ते यामुळे मोहीम सुकर व स्मरणीय, आणि उत्तम, किंबहुना स्मरणात राहील असा झालेला प्रवास.


10 comments:

  1. खूप सुंदर ! पावन खिंड मोहिमेचे अगदी यतार्थ वर्णन! Jaydeep from Team PHE

    ReplyDelete
  2. फारच सुंदर ...

    ReplyDelete
  3. Masta start ekdam surekh Keli, asach trek karat Raha ani lihit Raha!

    ReplyDelete
  4. खुप छान लिहिला आहेस

    ReplyDelete
  5. Apratim........ tya athvani khup surekh padhatine rekhatlya baddal dhanyawaad ...Paratekda jaun alysarkhe vatle..👌👌👌

    ReplyDelete
  6. Khub chaan lihle aahe mala samaj madhe aala pan me aadhi translate kela English madhe mah vachla ani mah marathi madhe 4 vela vachla theva kuthe jaun mala kalal 👍👍👌khub apratim u have expressed ani kalsubai cha kheva lihta aahe 😁😜

    ReplyDelete
    Replies
    1. haha.. thank you so much..tu evdhe kasht ghetles tyabaddal.. and i will certainly, try to pen down kalsubai in english

      Delete
  7. its really long story :) i'm very very slow in reading marathi. I could have done panhala to pavankhind one more time. But thanks for putting this in words

    ReplyDelete
    Replies
    1. it was real difficult to compress the write up.. :-)

      Delete