सकाळी सकाळी मयंकला "हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण!" ह्याचा अर्थ सांगताना खूप सहज बोलून गेले की 'देता आले पाहिजे'. देण्यातच खरा आनंद आहे. मयंकला ते कळले का नाही हा प्रश्न मला खूप उशिरा पडला पण त्याआधी, 'मी तशी आहे का?' असं वाटलं..
कुणी मला काय दिलय, म्हणून मी कुणाला काही द्यावं? असं वाटणाऱ्यांनी देण्याच्या नादीच लागू नये. कारण ते फक्त मत्सर आणि इर्षा देतील.
"देणं" म्हणजे प्रत्येकच वेळेला कोणतंही अर्थसहाय्य असलं पाहिजे असं नाही.
देण्यात प्रेम, आशा, आनंद, मैत्री याही गोष्टी येतात. कदाचित मला देण्याच्या त्या स्थितीत यायला अवकाश असेन, पण देण्यातल्या त्या आनंदाला मला मुकायच नाही.
हा विचार डोक्यात चालू असतानाच मी Signal ला येऊन थांबले आणि शेजारच्या गाडीवर एक मुलगी आणि एक आजी होत्या. ऊन फार नव्हते पण पाणी-पाणी होऊ शकणार होते. आजी त्या मुलीला म्हणाल्या की 'अगं!! पाण्याची बाटली विसरलेच मी'.
वास्तविक त्या माझ्याशी काही बोलल्याच नव्हत्या पण मी खूप सहज बोलुन गेले की, 'माझ्याकडे आहे, देऊ का?'
मी रोज तीन लिटर पाणी आणते Office ला. म्हणजे 1.Ltr च्या तीन बाटल्या.
त्या आजींना कळलें नाही हो म्हणावे का नाही. तोपर्यंत मी बाटली काढून त्यांच्या हातात ठेवली होती. त्यांना कदाचित हे सगळं अनपेक्षितच असेन.
पण त्या म्हणाल्या, 'खूप लांब जायचय, नेमकी मी बाटली विसरून आले'. म्हणलं, 'हो मावशी! राहू दे ती बाटली ऊन आहेच, तहान लागणारच.'
Signal सुटला आणि मी निघाले, निघताना मनात आलं, "माझ्या आईकडे खूप आहे..."
आईने एक गोष्ट लहानपणा पासून सांगितली आहे. एक लहान मुलगा आईला लाडू मागतो. आई त्याला डब्यातून काढुन लाडू देते. तो बाहेर येतो, ओसरीवर कामवालीचा मुलगा खेळत असतो, त्या लहान मुलाचे देखील सतत लक्ष लाडू कडे असते म्हणून तो लहान मुलगा त्याच्या हातातला लाडू त्याला देऊन टाकतो आणि त्याला सांगतो "माझ्या आईकडे खूप आहे."
आई म्हणते, 'जर ह्या आईकडे खूप असेन तर मग जग चालवणाऱ्या त्या माऊलीकडे किती असेन. मग मी का माझा हात चोरून काही द्यावं?'
"देणाऱ्याने देत रहावे..." जे देण्यासारखे आहे ते निश्तिच देत रहावे. किती बरं झालं ना सकाळी मी मयंकला त्या गाण्याचा अर्थ सांगितला,
कधी-कधी तर वाटतं आपण लहानमुलांना शिकवतो कमी आणि शिकतो जास्त.
खरचं जे होते ते चांगल्यासाठीच.
उत्तम!!!
ReplyDeleteVery nice. Really we learn lots of things ....well said
ReplyDelete- Avani