Tuesday, 11 September 2018

गोपाळ काला;

शाळेमध्ये दहिहंडी म्हणून आजी आजोबांनी मयंक आणि माधवसाठी कृष्णाचे असे नविन कपडे आणले... आजी-आजोबांना उत्साहच दांडगा...
सोमवारी ही दोघं गेली आजीकडे तर अर्थातच आजीला वाटलं घालून बघुयात नीट बसतायेत का? तर दोन्ही भावांनी त्या कपड्यांना त्यांच्या देहाच्या सावली इतके पण जवळ नाही येऊ दिले.
आजी तरी हरली नाही...
काहीतरी काहीतरी सांगून त्या दोघांना Convince करू लागली, पण दोघांनी नाही म्हणजे नाहीच दाद दिली....
संध्याकाळी आमच्या Society मध्ये आजीने दहिहंडी ठरविली Building मधल्या अजुन काही लोकांनीही त्यांच्या नातवंडांना, मुलांना पाठवले आणि ती दहिहंडी सजली...
संध्याकाळी लोकं Office मधून घरी न जाता तिथेच थांबू लागले...
मयंक आणि माधव खुश होते, दहिहंडी फोड़ायला मिळणार म्हणून... आधी थोडं फेर धरणं आणि नाचणं वगैरे झालं... मग मोठ्यांनी छोटयांना दहिहंडी फोडण्याची शिकवणी देणे चालू केले... पाया भक्कम पाहिजे हा तर दहिहंडीचाही पाया...
पण ही सगळी चिल्ली पिल्ली ना एका वयाची ना एका उंचीची... त्यांनी तयार केलेला पाया तो भक्कम कसा असेन??
कसा बसा मयंक चढला पण त्याला काही स्थिर उभे रहता येईना... त्यात वरून कोणीतरी पाणी टाकले, हा झाला ओला. (बरं... आजपर्यंत आम्ही जी दहीहंडी केली ती म्हणजे कृष्णाचे कपडे घालायचे आणि दहीहंडी फोडायची, मित्रांमध्ये काला वाटायचा आणि कृष्णाची गाणी म्हणायची... त्यात पाणी कधी वापरलं नव्हतं...)
आज हा वर चढला असताना पाणी पडलं जरा दचकलाच, अनपेक्षित होतं त्याला ते आणि नको पण वाटलं... एकीकडे मयंकचे adjust होणे चालू होते तर दुसरीकडे आमचे पेशवे माधवराव, आधी त्याला एकट्यालाच ड्रेस घातला म्हणून चिडला.... आणि चिडून चिडून तो काढून टाकला,  मग ते पाणी उडवाउडवी तर कोकणस्थी बीजाला चाललच नाही त्या गर्दीत हा पठ्ठा शिरलाच नाही...
कुठे तरी लांब उभे राहून जिथे अंगावर पाणी नाही पडणार, पाय घाण नाही होणार तिथे ऊभं राहून हा शहाणा Biscuit खात बसला...
हा आमचा Biscuit खाणारा कृष्ण, cricket ची match बघितल्यासारखा दहीहंडीची मजा बघत होता.. 
बाहेर तोपर्यंत ह्या सगळ्या मोठया मंडळींना लक्षात आलं होत की ही हंडी अशी फुटणार नाहीये...
मग मयंकच्या बाबाने मयंकला खांद्यावर उचलले, मयंकने आजपर्यंत काठीने हंडी फोडली होती, आज ती पहिल्यांदाच नारळाने फोडण्याचे Target होते... नारळ तसा छोटा होता  त्याच्या हातात बसेल असा. पण आता ती हलणारी हंडी फोडायची कशी? ह्याने घातला पहिला घाव.. नारळ सुटला हातातून आणि फुटला जमिनीवर जाऊन... नारळाचे दोन तुकड़े झाले... आतलं सगळं पाणी भूमातेला अर्पण...
(नशिब हे सगळं आमच्या कोकणस्थ पेशाव्यांनी नाही पाहिलं नाहीतर तिथेच मला पाणी हवं होत ना म्हणून रडला असता.)
त्या फुटलेल्या नारळाच्या दोन तुकडयांपैकी जो साधारण मोठा तुकडा होता, आणि जो मयंकला हातात धरता येणार होता तो मयंकला परत हातात दिला... हंडी फोडायला मयंकने परत त्या हंडीवर घाव घातला...असे दोन तीन वेळा झाले.
प्रत्येक वेळेला हातातला नारळ खाली पडला आणि सहाव्या सातव्या घावाने अखेर ती हंडी फुटली.. तोपर्यंत माझं लेकरु पाण्याने पुर्ण ओलं झालं होत...
पण कोकणस्थी स्वभाव, कुणाच्याही नकळत हा शहाणा घरात गेला स्वतःला कोरडे करून आणि नविन कपडे घालून बाहेर... काल्याचा प्रसाद देण्यासाठी मदत करायला हजर...
आता बाकीची सर्व मंडळी हंडी फुटल्याचा जल्लोष करत होती... प्रसाद घेण्याची घाई कुणालाच नव्हती. पण आमचा धाकटा कृष्ण.. प्रसादाचा एक द्रोण उचलुन, घरात जाऊन निवांत सोफ्यावर बसून चमच्याने प्रसाद खात बसला. (जग इकडचं तिकडे होऊ देत आपण खात रहायचं आश्या धोरणाने.)
अश्या रितीने घरी केलेली दहीहंडी आनंदात, उत्साहात आणि पाण्यात पार पडली.
आता दुसऱ्या दिवशी शाळेत दही हंडी होणार होती..  त्यासाठी तर नविन कपडे आणले होते...
आजीने सुंदर मुकुट केले तिच्या दोन्ही नातवंडाना. खुपच सुंदर होते ते मुकुट...
दुसऱ्या दिवशी फारसं काम नाही.. दोघांचे आवरायचे आणि शाळेत नेऊन सोडायचे एवढेच.. (निदान असं आदल्या दिवशी झोपताना वाटलं)
दुसऱ्या दिवशी लवकर उठले...
दोघांना खायला आवडीचा शिरा केला...
(मयंक तसा साधा, पण माधवचा मुड भयंकर जपावा लागतो.)
उगाच त्याचा mood नको फिरायला म्हणून त्याच्या आवडीचाच नाश्ता केला.
मयंकला आधी आवरले. छान नवीन कपडे त्याने घालून घेतले. मुकुटही आणि बाजुबंदही. गोडच दिसत होता माझा कृष्ण.
आता माधवला आवरायचे होते. तो कृष्णाचा ड्रेस पाहूनच त्याचं डोकं फिरलं...
शाळेला Uniform घालूनच जायचं, असा हट्ट आमच्या ह्या धाकट्या कृष्णाने चालू केला...
नाही म्हणजे नाहीच घालून घ्यायला तयार शेवटी दादा मदतीला आला... मयंक दादाने समजावून सांगितले मग कुठे तो थोडा Convince झाला. दोघांना भराभरा गाडीत चढवले आणि शाळेत नेऊन पोहचवले... पोचल्यावर, आमचे रुसलेले पेशवे जागेवरून उठायला तयार नाहीत... गणपती बसल्या सारखा बसून राहीला.. तसेच त्याला उचलले तर अंग सोडून दिले ह्या पठ्ठयाने..  त्यामुळे भयंकर जड़ झाले त्याला उचलायला... त्याला बाहेर काढतीये तोपर्यंत त्याची बासरी पडली, तीही गाडी खाली... ती काढायला गेले तर गाडीची किल्ली पडली... माझी उडालेली धांदल बघून मयंक मदतीला आला... तर त्याचे मुकुटाचे दोन मणी पडले म्हणून त्याची राडारडी, मला अजुनच सुधरेना शांतपणे त्याला म्हणलं आधी शाळेत पोहचू...
माधवला उचलून कडेवर घेतले...
एका हातात दोघांच्या बॅगा, कडेवर माधव...
दुसऱ्या हाताला मयंक...
ते दोघे कृष्णावतारात आणि मला घडलेले विश्वरुपदर्शन...
शाळेच्या दारात Teacher कडे माधवला दिले. बाकीची मुले देखील कृष्ण बनून आले आहेत हे बघितल्यावर त्याचा Uniform न घातल्याचा रुसवा गेला..
एवढं Uniform चं वेड आहे तर Army मध्ये जाशील का असं आलं माझ्या मनात...
पण अडीच वर्षाच्या लेकरासाठी ते स्वप्न आकलनापलिकडचच..
आता मयांकचा मुकूट दुरुस्त करायचा होता.. fevicol बरोबरच होता...  ते पडलेले मणी त्याने जपून ठेवले होतेच.. त्याच्या मुकुटाला ते चिकटवले.. आणि मयंकच्या चेहऱ्यावर जो काही आनंद पसरला तो अवर्णनीय होता.. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधावा म्हणजे आनंदी राहणच अंगवळणी पडतं हे लहान मुलांकडूनच शिकता येते..
ते दोघे आनंदाने शाळेत गेले, हुश्श झालं....
मी गाडीत येऊन बसले..
घोटभर पाणी प्यायला आणि radio लावला, तर गाणं होतं, "हे जीवन किती सुंदर आहे"!!!!!!!!!!

Friday, 7 September 2018

ऐनक

"च्यायला दिसेना यातून नीट" नुकताच डोळे तपासून नविन चष्मा केलेला, तो काढत वैतागत मन्या म्हणाला..
पारंपारिक कोकणस्थ कुटुंबात वाढलेला मन्या.. आईचा लड़का आणि लग्नानंतर बायकोनेही लाडवलेले...
प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे पाहिजे आणि जशीच्या तशी.. आवडी निवडी ठरलेल्या आणि त्यात बदल नाही म्हणजे भाजी जेवढी शिजायला पाहिजे तेवढीच शिजायला पाहिजे,थोडीही कमी जास्त नाही चालणार. झालीच तर लगेच बायकोला फ़ोन लावून तिची शाळा घेणार....
बायको सुगरण आणि मुलं डामरट पण मन्याच्या काळजाची तार....
बाहेरचे खायला फारसे आवडत नाही असे घरी सांगुन सुगरण बायको कडून चविष्ट पदार्थ करवून घेणार...
ते फस्त करणार आणि बाहेरचे डब्यात घेऊन खाल्लेच तर मित्राच्या नावाखाली खपवणार...
तर अश्या या मन्याला लागला चाळीशीचा दागिना, अर्थातच चश्मा... त्यात भरीस भर म्हणजे एका डोळ्याला लांबचा नंबर...  
आपल्या आयुष्यात झालेल्या या आमूलाग्र बदलाला मन्या, खंबीरपणे सामोरे जाण्याचा शर्थीने प्रयत्न करत होता. 
आधी बरेच दिवस वाचायला त्रास होतोय आणि डोकं दुखतय असं तो रोजच आपल्या सवंगडयांना सांगत होता...
काळजीने सगळे 'अरे..! जाऊन ये डॉक्टर कडे' असा सल्लाही देत. पण डोळ्याला नंबर निघाला तर. या धास्तीने तो जाणे टाळत होता. सायनसचा त्रास तसाही होताच, तर कदाचित त्यानेही दुखत असेन असं त्याला वाटे.
पण मनाच्या कोपऱ्यात त्याला माहीत होते, 'हे दुखणे वेगळे आहे' शेवटी धीर करून मन्या डोळ्यांच्या Doctor कडे पोहचला आणि भिती खरी ठरली. चाळीशी आली आणि लागली देखील. 
दुसऱ्या दिवशी Office मध्ये आल्यावर जाहीर केले "चष्मा लागला आहे" मित्रमंडळी एवढी जिवाभावाची की आलेली संधी कसं काय दवडतील?!!
"चष्मा नाही चाळीशी लागलीय" ह्याचा तर रेटाच चालू झाला, "मग सगळं खायचं, नसता लागला चष्मा"
लेकीने तर घरी declare केले  "बाबा आता तू माझ्या शाळेत येऊ नकोस, आजोबा वाटशील." बिचारा मन्या! हे सगळे टोमणे ऐकंतच आपल्या चष्म्याविषयीच्या कुतुहलाला पण जागृत ठेवत होता. "मग एका दिवसातच मिळेल का कुठे चष्मा?" "माझ्या नाकावर बसणारा, मला बघून घ्यावा लागेल ना?" " चांगला टिकाऊ कुठे मिळेल? जवळचा आणि लांबचा वेगवेगळा करायचा का?" हे व असे अनेक प्रश्न. Office मधून सुटल्या सुटल्या मन्याने चष्माघर गाठले आणि चष्मा करायला दिला. 
दुसऱ्या दिवशी Office मध्ये आल्या आल्या लहान मुल कसे त्यासाठी घेतलेली एखादी वस्तू कौतुकाने दाखवते तसा मन्याने चष्मा दाखवला. मन्या उंच, गुबगुबीत व दिसण्यातही कोकणस्थ आणि चष्मा केला होता Rimless...
छानच दिसत होता त्याला आता आपल्यावर कोसळलेली डोकेदुखी आणि डोळे दुखीचे संकट टळले ह्याचा दिलासा त्याला वाटत होता.
त्याने चष्मा घातला युद्धावर निघालेला योद्धा जसं चिलखत घालतात तसा त्याने चष्मा घातला.
थोड़ा वेळ काम केले आणि परत अस्वस्थ झाला. डोके आणि डोळे दुखत होते. चष्मा घातल्यावर सुद्धा. त्याने चष्मा काढून ठेवला डोळ्याला आराम वाटला. लगेच त्याने विचारले,"चष्मा घातल्यावर सगळे मोठे मोठे दिसते का?" तसं तर दिसत नाही. मग त्याला साक्षात्कार झाला की चष्मा नसल्यावर सामान्य डोळ्यांना जसे दिसते तसे चष्मा घातल्यावर दिसणे अपेक्षित आहे. तेवढयात कुणीतरी म्हणाले की, अजुन डोळ्यांना सवय नाहीये म्हणून तसं होत असेल मन्याला ते ही पटले...
त्याने लगेच प्रमाणिकपणे चष्मा घातला पण लगेच थोड्या वेळातच तो परत लगेच काढला त्याला लक्षात आले की काहीतरी गडबड झाली आहे तातडीने चष्मा घेऊन तो चष्मेवाल्या कडे गेला. 
मन्याला जवळचा आणि लांबचा असे दोन्ही नंबर होते. पण चष्मा फक्त जवळच्या नंबरचा केला होता आणि त्यातही तो करायला चुकला होता चष्म्याच्या नावाखाली भिंग दिले होते, म्हणून मन्याला सगळे मोठे मोठे दिसत होते. मन्याने लगेच नवीन चष्मा करायला टाकला...
तेवढ्यात मन्याच्या मनात एक विचार डोकावला "Lens करून घेऊ का?, नको नको कुठे नसत्या भानगडी." 
आता चष्मा बरोबर नंबरचा होता. डॉक्टर ने मन्याला सांगितले की सवय होई पर्यंत थोड़ा वेळ लागेल, पण वापरत रहा म्हणजे लवकर सवय होईल. 
मन्या बरं म्हणून चष्मा घेऊन आला. मन्या, अचानक आयुष्यात बदललेल्या घडामोडींची सवय करून घ्यायचा प्रयत्न करत होता.
त्यातच Office  मध्ये एका ताईने, 'अरे तुला जर चष्मा लावून त्रास होत असेल तर तुला चष्मा नसेनच' अशी भाबडी आशा दिली. पण निराधार सकारात्मकता ती...
चष्मा तर आता आयुष्यभरसाठी लागला होता. मान्याकडे तीन चष्मे झाले.. जवळचा लांबचा आणि भिंगाचा, पण आता मन्याच्या मनाला चष्मा लागल्याचे दुःख जसे सहन करायचे होते तसे आता डब्यातले गाजरपण आयुष्यभरासाठी मागे लागले होते......