Saturday, 8 May 2021

गोष्ट तिची आणि माझी

'काय बरे टोपण नाव द्यावे हिला?'
माझा मनात विचार सुरू होता!
खरं तर टोपण नाव आपण आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीला किंवा आपल्या प्रेमळ पाळीव प्राण्याला देतो..
पण ही तर माझ्या अजिबात च आवडीची नाहीये.. आणि माझी ईच्छा नसताना, ही "पाळीव" होऊ पाहतीये.. मग माझी नैतिक जबाबदारी ठरते हिला टोपण नाव देण्याची.
तसे घरात बाकी लोकांना हिच्या बद्दल काही problem च नाहीये.. त्यामुळे सगळे कदाचित त्या टोपण नावाबद्दल खूप खूषच होतील.. किंवा कदाचित कुणाला काहीच फरक पडणार नाही.. 
पण मी आता ठरवलंय की हिला टोपण नाव देऊयात.. 
तसा हिचा गुणधर्म मुळातच चिकट.. दिवस दिवस एकाच ठिकाणी बसून राहू शकते ही.. बसून नाही म्हणता येणार चिकटुन असते.. आणि डोळे रोखून एखाद्याला बघत बसते.. म्हणे ही घरातले किडे वगैरे खाते, पण मला तरी ही 'पिंटी' (हे टोपण नाव सुचले आत्ता मला) कोणतेही काम करताना कधी दिसत नाही.. 
आता जाऊदे म्हणा प्रत्येकच जीवित घटकाचा आपल्याला उपयोग होईल असंही काही नाही.. म्हणून आपण काही किळसवाण्या घटका कडे दुर्लक्ष करत असतो.. पण ह्या घटकांनी जर आपल्या हात धुवून मागे लागण्याचे ठरवले असेल तर आपण तरी काय करणार? मग हताश पणे आपण हिला टोपण नावे वगैरे शोधत बसणार..
कधी तर मला वाटतं ह्या पिंटीचं आणि माझं मागच्या जन्मीचे काहीतरी नातेच आहे.. मी जिथे जाईल तिथे ही येतेच.. जसे काही "में तुम्हे कभी छोडके नही जाऊंगी" types वचन वगैरे दिलंय.. 
कधी चुकून उठायला उशीर झाला, पटापटा घरातले काम संपवून ऑफिसला जायची घाई असली.. की ह्या पिंटी बाई दारावर, नाहीतर दुधाच्या पिशव्यांसाठी gate ला टांगलेल्या पिशवी मागे नाहीतर हेल्मेटच्या आसपास, अश्या दबा धरून बसलेल्या असतात.. जणू आम्ही लपाछपी खेळतोय आणि बाईसाहेबांवर राज्य आहे.. आणि आता धप्पा करतील.. धप्पा करो ना करो, हिला बघून मी तशीही out च.. 
पण तरी लोकांचे असे म्हणणे आहे की ती मुळातच शांत प्राणी आहे.. माझ्यासाठी तर तिची शांतता वादळा पूर्वीची असते..

एकदा प्रचंड पाऊस पडत होता म्हणून मी ऑफिसला दुचाकी ने न जाता चार चाकी ने जायचा निर्णय घेतला.. मुलांना आई कडे सोडून ऑफिस ला जायचे होते म्हणून खूप घाई चालली होती माझी.. गाडी बऱयाच दिवसांनी बाहेर काढली होती म्हणून जरा अस्वच्छ होती.. थोडया वेळेने काचेवर काही हलतंय असे वाटून, मी काचे कडे पाहिले.. तर आमची पिंटी तिथे.. जणू आता मला फिरवून आण म्हणतीये, किंवा ऑफिसच्या कामात मदत वगैरे करायची होती की काय!
मी भरा भरा काचा लावून घेतल्या सगळ्या.. 
ती तशी आत आलीच नसती (कदाचित) पण कोण risk घ्या.. माझे हे चमत्कारिक वागणे बघून मुलांनी काय झाले? काय झाले असे विचारले.. मी सांगितले पिंटी आहे काचेवर म्हणून सगळं बंद केलंय.. तर त्यांनी धक्कादायक प्रतिउत्तर दिले की, 'अगं आई, पाचोळा आहे तो'!!!!!!!!
मला वाटले काहीही काय, म्हणून मी नीट पाहिले तर खरचंच पाचोळाच होता तो.. 
"बापरे!" मला वाटले, 'आता मला हिचे भास पण व्हायला लागले!!" किंवा पिंटी च्या कुणी पूर्वजांचे भूत वगैरे नाही ना जे माझ्या मागे लागलंय.. पण मी असं काय वाईट केलंय ह्यांच्या जमातीचे की ह्यांनी मलाच येऊन असा त्रास द्यावा.. त्याच विचारात office ला पोहचले आणि ऑफिसच्या कामात थोडा वेळ पिंटीचा विसर पडला.. 
संध्याकाळी घरी येताना परत धाकधूक की ही पिंटी येते का परत! पण नाही मी सुखरूप घरी पोहचले..
तरीही हीचा चेहरा काही डोळ्यासमोरुन जात न्हवता!
सकाळी मी आईला सगळा किस्सा सांगितला.. तर आधी आई पोट धरून हसली.. मग माझी चेष्टा करत म्हणाली की आपण तुला 'पाली'ला नेऊन तुझी शांती करून आणुयात.. तिला गंमतच वाटत होती, मग ती मला म्हणाली तू तिच्याशी मैत्री का नाही करत?
मैत्री??? काय संबंध??
काहीही काय??
मग मीच शांत पणे विचार केला, मैत्री वगैरे तर काही शक्य नाही, पण आपण ह्या पिंटिकडे दुर्लक्ष तर करूच शकतो!
ठरले तर मग, इकडे तिकडे बघायचेच नाही झापडे लावल्या सारखे आपले आपले काम करत राहायचे!!
पण हे मी ठरवून उपयोग न्हवता ना, हे सगळे तिने ठरवायला हवे होते!!
सकाळी उठून किती वाजले आहे बघायला घड्याळ पाहिले तर घड्याळा शेजारी पिंटी ताई मला good morning करायला आल्याच होत्या.. जाऊदे म्हणून स्वयंपाक संपवून अंघोळीला गेले तर बाथरूम च्या दारा मागे होत्याच.. मी लगेच घड्याळा कडे धावले भास तर नाही ना म्हणून, तर नाही घड्याळा कडे पिंटी ताई न्हवत्याच.. 
दुसऱ्याच बाथरूम मध्ये आवरून घेतले मग!
लिफ्ट मधून बाहेर आले तर नावांचे जे फलक आहे तिथे पिंटी ताईंचे कुणीतरी नातेवाईक होतेच... 
कितीही झापडे लावली तरी ही पिंटी त्या झापडावर येऊन चिकटेल...
आता मला वाटू लागलंय की तिला मी खूप आवडते.. 
पण मला ती अजिबात नाही आवडत, ती कदाचित मला बघण्यासाठी अत्यंत आतुर असते पण ही पिंटी समोर असेल तर मी फक्त अस्वस्थ असते, ती कदाचित मला साथ द्यायला बघते पण मी मात्र सतत तिला झटकत राहते, मी जितकी तिच्या पासून लांब राहायला बघते तितकी ती माझ्या समोर येत राहते.. 
घरातून निघाले की लिफ्ट च्या भिंतीवर.. जिन्याने चालले की कुठल्याश्या कोपऱ्यात, घरी आले की घराच्या दारावर.. सकाळी उठून kitchen मध्ये गेले तर गॅस च्या खाली.. रात्री चुकून तिथेच गेले तर फ्रीजच्या पाठी, घड्याळ, फोटो फ्रेम कुंड्यांचा आडोसा तर ती सतत घेते, बऱ्याचदा तर फक्त मलाच दिसते.. 
तिच्या माझ्यावरच्या ह्या निःस्वार्थ प्रेमाचे अगणित किस्से आहेत.. अगदी लहानपणापासूनचे.. 
तिला मला घाबरवण्याची आवड आणि मला त्याची सवय.. 
मी जशी मोठी झाले तशी माझी भीती पण मोठी झाली पण ती तेवढीच राहलीये आणि तशीच राहलीये.. 
केव्हाही कुठेही येऊन मला घाबरवण्याचा कार्यक्रम ती करू शकते.. 
आणि वेला पण तिच्या एकदम special ठरलेल्या.. 
मी घाईत असेल किंवा मी घरात एकटी असेल किंवा मी काही स्वच्छता करायची ठरवली असेल, तर पिंटी madam तत्परतेने हजर.. म्हणजे माझे सगळे अवसान कोलमडून जाणार.. आणि मी बाकी काही न करता हिच्या हालचाली नोंदवत बसणार! मी आपली डोळ्याच्या कोपऱ्यातून ती गेली का बघत राहते आणि ही आपली सतत रोखून बघत असते, 
कोणत्याही कोऱ्यात कधीही प्रकट होणे..आणि गेली गेली म्हणे पर्यंत अचानक समोर येणे.. एवढं अति एकतर्फी प्रेम सहनच होत नाही मला..
तिचे माझ्यावर जेवढे प्रेम आहे त्यापेक्षा माझे तिला घाबरणे खूप मोठे आहे.. 
आमच्या मध्ये हे अजब नाते किती जन्मापासून आहे माहीत नाही.. पण हे भगवंता!! पुढच्या जन्मी तरी हे नको रे बाबा!!

3 comments:

  1. खूप मजेशीर आहे पाली बद्दलच मत😂😂😂

    ReplyDelete
  2. चिंचवडच्या घरात हॉल मधल्या खिडकीवर अशीच एक पिंटी आम्हाला रोज दर्शन देते

    ReplyDelete
  3. गंधाली माझी ही कुणाशीही मैत्री होऊ शकते, पण पाल सोडून.

    त्यामुळे तुझी आई म्हणाली तसे पाली ला जाऊन शांत करूनच येऊ👍🏻😅😅

    ReplyDelete